जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीला आज (दि. १४) छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून जोरदार सुरुवात झाली. समर्थकांच्या जोशपूर्ण घोषणा आणि महाराजांच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण तयार झाले.
आज (दि.१४) सकाळी शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रचार दौरा केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ झाला. त्यानंतर आनंद मेडीकल, अमर चौक, श्री मोटर्स, मारवाडी गल्ली, राजवाडा, शिवमंदीर, बोहरा मज्जिद, रॉकेल डेपो, हुडको, पुष्पांजली पार्क, उनिया हौसिंग सोसायटी, सावंत बिल्डींग, जोगीथांची गल्ली, बियाणी गल्ली, डी.बी.जैन हॉस्पिटल यामार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ प्रचार दौऱ्याचा समारोप झाला.
आज बाल दिनानिमित्त जयश्री महाजन यांनी रॅली दरम्यान लहान मुलांशी दिलखुलास गप्पा मारल्या. लहानग्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना, त्यांनी त्यांच्या गप्पांतून मुलांशी जिव्हाळ्याचे नाते जुळवले. मुलांसोबत फोटो काढताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद विशेष उल्लेखनीय होता. बालगोपाळांची जिद्द, ऊर्जा, आणि चिकाटी हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असल्याचे मत जयश्री महाजन यांनी व्यक्त केले.
रॅलीदरम्यान जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने उत्तर देत त्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. मतदारांना आवाहन करताना, निवडणुकीच्या दिवशी अनुक्रमांक दोन वर ‘मशाल’ चिन्हासमोरचे बटण दाबून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन जयश्री महाजन यांनी केले. “तुमच्यासाठी सेवा करण्याची संधी मिळावी, हाच माझा एकमेव उद्देश आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या प्रचार रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेना नेते विजय बांदल, विजय राठोड, यश उपाध्ये, सागर उपाध्ये, पंकज व्यास, संजय सांगळे यांसह महिला आघाडीच्या महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगरप्रमुख निता सांगोळे, तसेच जया तिवारी आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी रॅलीत भाग घेतला. शिवाय महाविकास आघाडीचे अन्य नेते आणि जळगाव शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीने जळगाव शहरातील वातावरणात एक नवा उत्साह भरला आहे. त्यांच्या विजयासाठी महिलांनी कटिबद्ध असल्याचे रॅलीत स्पष्ट दिसले.







