नाशिक (प्रतिनिधी कुबेर जाधव) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यंदा निवडणूक आयोगाच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून बेकायदेशीर रक्कम, सोने, चांदी, दारु आणि अंमलीपदार्थ जप्तीची धडक कारवाई केली आहे.
या कारवाईत आतापर्यंत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सोमवारी विधानसभा निवडणुकीचा प्रचार तोफा थंड झाल्या. परंतु त्यानंतर दोन दिवस निवडणूक आयोगाचे पथके आणि पोलीस प्रशासन अधिकच सतर्क असणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होत आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
सोमवारी नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये पैसे सापडले आहेत. त्या रुपयांची मोजणी निवडणूक पथकाकडून करण्यात येत होती. ही रक्कम पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या ठिकाणी राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडी जप्त करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी मुंबईत ८० कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर जळगाव आणि नागपूरमध्ये सोने, चांदीचे दागिने जप्त केले होते. हे दागिने सराफ व्यावसायिकांचे होते. परंतु त्यासंदर्भातील कागदपत्रे नसल्यामुळे ते जप्त केले होते.







