पन्हाळा (प्रतिनिधी अनिल सांगळे) : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील, केर्ले या गावातील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिर, या शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कु. स्वरूप दिपकराज माने (वय ११) या विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट अंगावर पडून दुर्दवी मृत्यू झाला.
करवीर तालुक्यातील केर्ले या गावात स्वरूप (वय ११) हा इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होता,गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो सकाळी १० वाजता शाळेत गेला व वर्गात दप्तर ठेवून तो बाहेर गेटजवळ येऊन थांबला असता,त्याचवेळी गेटचा लोंखंडी दरवाजा स्वरूपाच्या अंगावर पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक , व शाळेच्या जवळ असणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली,व बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले,या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी रुग्णालयात धाव घेतली. चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांनी आक्रोश केला. सिपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे केर्ले गावामध्ये व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.







