अमरावती (प्रतिनिधी) : पथ्रोट येथील एका खासगी संस्थेच्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी पालक आणि गावकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शाळेत इंग्रजीच्या शिक्षकाने २५ नोव्हेंबरला विद्यार्थिनीचा विनयभंग केला. ही बाब विद्यार्थीनीने मंगळवारी मुख्याध्यापकांना सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, शिक्षक आणि पालकांना शाळेत बोलवून, हा प्रकार सविस्तर जाणून घेतला. दरम्यान, संतप्त गावकरी शाळेत दाखल झाले.
पालक आणि मुख्याध्यापकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पथ्रोट पोलिसांनी मुलीकडून माहिती जाणून घेत, पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली. गावात सध्या पोलिसांनी चोख बंदोबस्त केला असून, पालकांना शांतता ठेवण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान २ दिवस हा शिक्षक सुट्टीवर होता. मात्र, शिक्षक शाळेमध्ये परतल्याचे समजताच, संतप्त गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतली. शिक्षकाच्या कारची तोडफोड करत ती उलटवून दिली. शाळेच्या आवारात गावकऱ्यांनी शिक्षकाला ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र, शिक्षकाने शाळेतच स्वतःला कोंडून घेतले. चोख पोलीस बंदोबस्तात त्याला खोलीबाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, पालकांनी शाळेच्या आवारात घुसून शिक्षकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी पालक आणि गावकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.







