एटीएमक़ार्डची अदलाबदली करुन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पालघर पोलिसांनी केले जेरबंद

पालघर पोलीस

ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : एटीएममधून पैसे काढत असतांना ३ अनोळखी इसमांनी पैसे काढून देतो असे सांगून हातचलाखी करून पालघर येथील भगवान नामदेव हातेकर (वय ६७, रा.नेस्ट अपार्टमेंट, टेंभोडे) यांचे एटीएम बदलून दुसरे एटीएम कार्ड देवून, त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिस ठाणे येथे १९४/२०२४ गुन्हा दाखल होता.

 

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवन, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी पोनि प्रदिप पाटील, यांना तपास पथक तयार करुन तपासाबाबत सूचना दिल्यात. यातील ३ अनोळखी आरोपित यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरु असतांना पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत यांना बातमीदारांकडून सदर आरोपीत बनेली, टिटवाळा येथील राहणारे असल्याचे समजले.

 

मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने बनेली, टिटवाळा येथे जावून किस्मत बरकतअली शेख (वय २७), हसमत बरकतअली शेख (वय ३२), हरेश राहुल प्रधान (वय २१) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांचा आणखी एक साथीदार दिपक बिपीन झा (रा.उल्हासनगर) असल्याची त्यांनी कबूली दिली. त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन होन्डा सिटी (क्रमांक एमएच ०२ सीडी ४४६१) किंमत ५ लाख व ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय सदर आरोपितांवरील पालघर पोलीस स्टेशन अंतर्गत ५ गुन्हे व नारपोली पोलीस ठाणे, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, डोंबविली पोलीस ठाणे, भिवंडी पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे, ठाणेनगर पोलीस ठाणे, मुंब्रा पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे, कल्याण तालुका पोलीस ठाणे आदी ठिकाणी दाखल १४ गुन्हे दाखल आहेत.

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोउनि गणपत सुळे, पोउनि रोहित खोत, पोउनि रविंद्र वानखेडे, पोहवा संतोष निकोळे, विजय ठाकूर, पो.अंमलदार वैभव जामदार सर्व स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोहवा भगवान आव्हाड, सागर राऊत, चंद्रकांत सुरुम, पो.अंमलदार सायबर सेल किशोर पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास पोउनि दौलत आतकरी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here