ठाणे (प्रतिनिधी प्रकाश कदम) : सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, एकता, बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू व व्यासंगी व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यावेळी कायदा, पाटबंधारे, मजूर व वीज मंत्री म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयी – सुविधांची मुहूर्तमेढ करणारा ठरला आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलल्या कामातून संविधानाचा अंमल दिसून येतो.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो. यावरून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांचे लिखाण एक प्रमाण म्हणून मानल्या जाते. त्यांनी तेव्हा लिहीलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या येवू दे, त्या सोडवण्याचा उपाय भारतीय संविधानामध्ये आहे. असे जगात सर्वात सुदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे.
इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल. राज्यात शासन नेहमी वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा पहिल्यांदा विचार करणार असून संविधानाच्या अनुरूप कार्य करेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामध्ये आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार आहे. त्यांनी दिलेले संविधान हे कायम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा उपयोग आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हे विचार कुठेही कमी पडणार नसून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून शासनाचा कारभार – उपमुख्यमंत्री अजित पवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार असणार आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार शासन करणार असून त्यामुळे त्यांच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला बंधुता, एकता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. येथे आलेला हा अथांग जनसागर त्याचेच प्रतिक आहे.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.







