पनवेल/अलिबाग-सोगावकर:- कठीण समय येता कोण कामास येतो, ही प्रचलित म्हण खोडून काढत सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू शेकडो कोविड रुग्णांना आधार ठरत आहेत. समाजधुरिणांनी दरवाजे लावून घेतल्यानंतरही कडू झोकून सेवा देत आहेत. काल तीन लाख आणि आज दोन लाख अशी कोविड रुग्णांना हॉस्पिटलच्या बिलात पाच लाखांची सूट मिळवून देत ‘संकटमोचक’ असल्याचे दाखवून दिले आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत समाज कोविड साथीशी लढत आहे. त्यात आर्थिक मंदीचे संकट घोंगावत आहे. कोविड रुग्णांवर उपचार करताना खासगी हॉस्पिटल खिशाची शस्त्रक्रिया करून रुग्णांना नागवे करीत आहेत. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक कमालीचे व्याकुळ झाले असून त्यांना कुणीही मदत करायला पुढे येत नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे डॉक्टरांना अभय असल्याने डॉक्टरांना कुणाचे भय उरले नाही. ते अक्षरशः कसायासारखे रुग्णांवर तुटून पडत आहेत.
डॉक्टरांच्या लुटमारीला कंटाळून काही जण नाईलाजास्तव जमावाजमाव करून बिलाची रक्कम देत आहेत. काही जण दागिने इतर किंमती वस्तू गहाण ठेवून, विकून डॉक्टरांच्या घशात पैसे ओतत आहेत.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्याकडे तक्रार आली की एक घाव दोन तुकडे करून कोविड रुग्णांना पुरेपूर न्याय मिळवून ते देत आहेत.
काल स्वातंत्र्यदिनी तीन रुग्णांना कडू यांनी हॉस्पिटलच्या बिलाच्या रकमेत घसघशीत सूट मिळवून दिली. कळंबोली येथील माथाडी कामगार असलेल्या कोविड रुग्णाला चाळीस हजार रुपयांच्या सवलतीचा आधार मिळताच त्यांच्या कुटुंबाने कडू यांचे मनःपूर्वक ऋण व्यक्त केले आहेत.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पनवेल येथील कर्मचाऱ्याच्या पत्नीला अठ्ठावन्न हजार रुपयांची सूट मिळवून दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर पौर्णिमेच्या चंद्राची प्रभा फाकली. तर त्यांच्या समवेत सकाळपासून डिस्चार्जसाठी ताटकळत असलेले पाली (सुधागड) येथील पाटील नावाच्या रुग्णाला तब्बल अठ्ठ्यात्तर हजारांची सूट मिळवून दिली.
सोशल मीडियावर कडू यांच्या कोविड सेवेचा डंका वाजत असल्याने त्यांच्याशी अनेक जण संपर्क साधून माणुसकीचा अनुभव घेत आहेत.
आज सकाळी पनवेलच्या एका नामवंत व्यक्तीचे कोविडमुळे निधन झाले. त्याला जवळपास साडे चार लाखाचे बिल देण्यात आले होते. कडू यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांना तीन लाखाची बिलात घसघशीत सूट मिळवून दिली.
संकटकाळात कांतीलाल कडू सर्वसामान्यांना मोठा आधार ठरत असल्याने ‘संकटमोचक’ म्हणून त्यांच्याकडे नागरिक सहकार्यासाठी अपेक्षेने हात पुढे करीत आहेत आणि कडू त्यांना इच्छापुर्तीचा आनंद देत आहेत.
याकामी कडू यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे ठाणे क्षेत्रिय अधिकारी डॉ. वैभव गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य झाल्याचे कडू यांनी सांगितले.







