परभणी (प्रतिनिधी) : येथे तिसऱ्यांदा मुलगी झाल्याचा राग आल्याने पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही थरकाप उडवणारी घटना परभणीतील गंगाखेड नाका परिसरात घडली आहे. पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्नानंतर मैनाला रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाल्यानंतर पतीविरोधात खून केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (२६ डिसेंबर) रात्री परभणीमधील गंगाखेड नाका परिसरात मैना काळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्या पतीचे नाव कुंडलिक काळे असे आहे. तिसरीही मुलगी झाल्याच्या रागात कुंडलिक होता. तो मैनाला सतत शिवीगाळ करत असे, तिला मारहाण देखील करत असे. यावरुन झालेल्या भांडणात कुंडलिकने रागाच्या भरात मैनाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात मैनाचे शरीर भाजले गेले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
तिन्ही मुली झाल्याने कुंडलिक आपल्या पत्नीला मारहाण करत असे. त्यांची भांडणे सोडवण्याचा भाग्यश्रीने अनेकदा प्रयत्नही केला होता. हा प्रकार घडल्यानंतर मैना काळेची बहीण भाग्यश्रीने कुंडलिक विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुंडलिक काळेला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.







