पत्नीला लपवून ठेवल्याच्या रागातून सासऱ्याचा खून; जावई अटकेत

निर्घृण हत्या
File Photo

कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) : पत्नीला कोठेतरी लपवून ठेवल्याच्या रागातून आणि कौटुंबिक वादातून सासरे जावेद बाबू लाटकर (वय-४१, रा- आझाद गल्ली) यांचा दगडाने व फरशीने ठेचून खून केल्याप्रकरणी जावई सिकंदर मोहम्मद अली शेख (वय- ३२, रा- षटकोन चौक) याला स्थानिक गुन्हे शाखेने कराड बसस्थानकावरून ताब्यात घेतले आहे. खुनाच्या घटनेनाबत दिलावर बाबू लाटकर (वय ४५, तीनबत्ती चौक, आझाद गल्ली) यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली होती.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शेख आणि मृत लाटकर यांची मुलगी सुमैया हे दोघे एक वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये राहत होते; परंतु या दोघांचे पटत नसल्याने व सततच्या वादामुळे सुमैया ही वडिलांच्या घरी येऊन राहिली होती. दोन महिन्यांपूर्वी सुमैया घरात कोणालाही न सांगता कोठेतरी निघून गेली. परंतु सुमैया हिला तिचे वडील जावेद लाटकर यांनीच कोठेतरी लपवून ठेवल्याचा संशय सिकंदर याला होता.

 

त्याच रागातून बुधवारी रात्री सिकंदर दुचाकीवरून एका साथीदारासोबत आझाद गल्लीतील लाटकर यांच्या घरी आला. त्याने सासरे लाटकर यांना ढकलत नेऊन गटारी जवळ पाडले. दगडाने व फरशीने त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार केले. यात लाटकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित शेख पसार झाला होता. संशयिताचा विविध पथकांद्वारे शोध सुरू होता. अवघ्या १२ तासात त्याला पकडण्यात यश आले.

 

शेख हा कराड येथील बसस्थानकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने कराड बसस्थानक परिसरातुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने खुनाची कबुली दिली. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलिस अमलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे, नवनाथ कदम, महेश पाटील, सागर चौगुले, यशवंत कुंभार व सायबर पोलिस ठाण्याकडील विनायक बाबर यांच्या पथकाने केली. अधिक तपास पो.नि. सचिन पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here