कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेत संपवलं जीवन

sucide-farmer

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घराजवळच्या चिक्कूच्या झाडाला दोरीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उदापूर (ता. जुन्नर) येथून समोर आली आहे.

बुधवार (दि.२५) दुपारी साडे तीन वाजताच्या दरम्यान प्रकाश (पप्पू) दत्तात्रेय सस्ते (वय ३३, रा. उदापूर, ता. जुन्नर) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येबाबत ओतूर पोलिस ठाण्यात प्रकाशचे वडील दत्तात्रेय महादू सस्ते यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मृत प्रकाश सस्ते यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश अल्पभूधारक शेतकरी होता. त्याला एक एकर शेती होती. तो खंडाने (मक्त्याने) सात एकर शेती कसत होता. शेतीसह जोडधंदा म्हणून पशुपालन करून दुधाचा व्यवसाय करायचा. शेतीसाठी आणि दुधाच्या व्यवसायासाठी त्याने जमिनीवर पतसंस्थाकडून कर्ज घेतले होते. तसेच काहीजणांकडून हातउसने ही पैसे त्याने घेतले होते.

गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर कोसळल्याने त्याचे आर्थिक गणित बिघडले होते. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी १८ गायींपैकी १० गाई विकल्या होत्या. मात्र तरीही कर्जाचा बोजा वाढतच चालला होता. दरम्यान, आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन लहान मुले यांचे भविष्यात कसे होणार? याची चिंता काही दिवसांपासून त्यास सतावत होती. यामुळे तो प्रचंड तणावात व आर्थिक विवंचनेत होता. याच तणावाखाली त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एल.जी. थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here