नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सकाळपासून दिल्ली-एनसीआरमध्ये घनदाट धुके पसरले असून, तापमान खूपच कमी असल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेत थंडीपासून बचाव करत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दिल्लीत अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. राजधानीच्या अनेक भागांमध्ये धुके, हलके धुके आणि काही ठिकाणी मध्यम धुक्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दुपारी वाऱ्याचा वेग ताशी १४ ते १८ किलोमीटरपर्यंत वाढेल, तर संध्याकाळपर्यंत तो हळूहळू कमी होऊन ताशी ८ किलोमीटरवर येईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दिल्लीत कमाल तापमान १७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ८ अंश सेल्सिअस राहील. काश्मीर खोऱ्यात थंडीची तीव्रता वाढली असून, तेथील नागरिकांसाठी ती मोठी समस्या ठरत आहे.
‘स्कीइंग’साठी प्रसिद्ध गुलमर्ग येथील किमान तापमान उणे ११.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हलकी आणि नंतर मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ०१ आणि ०२ जानेवारी रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ०३ ते ०६ जानेवारीदरम्यान मध्यम ते मुसळधार बर्फवृष्टी होईल, तर ०४ ते ०६ जानेवारीदरम्यान काही ठिकाणी जोरदार हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.







