थरारक पाठलाग करत २८ किलो गांजाचा साठा जप्त; एकाला अटक

अटक

नाशिक (उपसंपादक चांगदेव पु. पवार) : पोलिसांच्या ‘स्टॉप अॅण्ड सर्च’ कारवाईस झुगारून कार बेफाम चालवत पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या गांजा तस्करांचा शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. ७) मध्यरात्री पाठलाग केला. यात पाचपैकी एकास पोलिसांनी पकडले असून, त्याच्याकडून २८ किलाे गांजाचा साठा पकडला आहे. पोलिसांनी दुतर्फा पाठलाग करीत सावधगिरी बाळगत संशयितास पकडले. तर अंधाराचा फायदा घेत चौघे पसार झाले.

 

आडगाव पोलिसांतर्फे नववा मैल येथे मध्यरात्री अडीच वाजता अंमलदार बाळकृष्ण पवार व हवालदार भाऊराव गांगुर्डे हे स्टॉप अॅण्ड सर्च मोहिमेंतर्गत वाहनांची तपासणी करीत हाेते. मात्र, एमएच ०२ जेपी ०१२३ क्रमांकाच्या कारचालकाने वाहन न थांबवल्याने पोलिसांनी नियंत्रण कक्षास माहिती दिली.

त्यानुसार नियंत्रण कक्षातील अंमलदार सुगंधा नवले यांनी गस्तीवर असलेल्या सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्यासह आडगाव, म्हसरूळ, पंचवटी, मुंबईनाका, भद्रकाली पोलिसांसह विशेष शाखेच्या गस्ती पथकांना संशयित वाहनाची माहिती दिली. पोलिसांच्या आठ पथकांनी वाहनांमधून थरारक पाठलागास सुरुवात केली. भरधाव कार चालवत संशयिताने पोलिसांच्या चार वाहनांना धडक देत त्यांचा अपघात करण्याचाही प्रयत्न केला.

 

संशयितांनी नववा मैलपासून द्वारकापर्यंत कार पळवली. तेथून यू टर्न घेत अमृतधाम तेथून पुन्हा के. के. वाघ कॉलेज व तेथून चक्रधरस्वामी मंदिरापर्यंत असा सुमारे २५ किमी अंतर पळ काढला. मात्र, पोलिसांनी दुतर्फा वाहने ठेवत अखेर पोलिसांनी चक्रधर स्वामी मंदिरापर्यंत पाठलाग करीत संशयितांची कार पकडली. त्यातून चौघे संशयित अंधारात पसार झाले. तर पोलिसांनी आकाश गणेश डोळस (३६, रा. पनवेल, रायगड) यास पकडले. वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये २८ किलो गांजा आढळून आला. संशयितांनी धुळे येथून गांजा घेतल्याचे उघड झाले असून, ते नवी मुंबईला गांजा नेत होते.

 

न्यायालयाने संशयित डोळस यास शुक्रवार (दि. १०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयितांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच अमली पदार्थ बागळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांस पकडण्याच्या मोहिमेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here