मोबाईलसाठी पैसे न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही त्याच दोरखंडाने घेतला गळफास

आत्महत्या

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : शालेय साहित्यासह नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याने १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडवून घेतला व त्याच दोरखंडाने त्याच झाडाला वडिलांनीही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बिलोली तालुक्यातील मिनकी येथे गुरुवारी उघडकीस आली.

 

अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (४३) यांच्या कुटुंबात २ एकर जमीन आहे. शेतावर कर्ज व सततची नापिकी होत असल्याने मुलांच्या शिक्षण खर्चाबाबत नेहमी घरात आर्थिक ताण पडायचा. अशातच उदगीर येथे शिक्षणास असलेला ओमकार राजेंद्र पैलवार (१६) हा संक्रांतनिमित्त गावाकडे आला होता. तो दि.८ रोजी दुपारी वडिलांना नवीन कपडे व शालेय साहित्यासह नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे मागत होता. परंतु वडिलांनी ‘काही दिवस थांब, पैसे नाहीत. पैसे आले की घेऊन देतो…’, असे म्हटल्यावर मुलगा नाराज झाला.

 

वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून त्याने नैराश्यात येऊन रात्रीच्या वेळेस शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा घरी नसल्याचे पाहून राजेंद्र पैलवार हे दुसऱया दिवशी सकाळी त्याची शोधाशोध करीत शेताकडे गेले. यावेळी शेतातील लिंबाच्या झाडाला ओमकार याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. वडिलांनी मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडवून घेतला. त्याच दोरखंडाने त्याच झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here