जम्मू (वृत्तसंस्था) : नौशेरा येथे भूसुरुंगाचा स्फोट झाला असून यात लष्कराचे ६ जवान जखमी झाले आहेत. भवानी सेक्टरमधील माकडी भागात स्फोट झाला. जखमी जवानांना उपचारासाठी राजौरी येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.हा अपघात आज म्हणजेच १४ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ वाजता घडला. ही घटना घडली तेव्हा ५/३ गोरखा रायफल्स (GR) ची एक तुकडी खांबा किल्ल्याजवळ गस्त घालत होती.
या स्फोटात हवालदार एम. गुरुंग (४१), हवालदार जे. थप्पा (४१), हवालदार जंग बहादूर राणा (४१), हवालदार आर. राणा (३८), हवालदार पी. बदर राणा (३९), हवालदार व्ही. गुरुंग (३८) हे जवान जखमी झाले आहेत.
९ डिसेंबर २०२४ रोजी जम्मूतील पूंछ येथे स्फोट झाला होता, ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. पूंछमधील ठाणेदार टेकरी येथे गस्त घालत असताना भूसुरुंग स्फोटात २५ राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार व्ही. सुब्बैया वारीकुंता यांचा मृत्यू झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली होती. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टनमधील पलहल्लन भागात एक आयईडी निकामी करण्यात आला होता पाटणमधील पलहल्लनमध्ये सुरक्षा दलांना आयईडी आढळून आला. घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक (बीडीएस) पाठवण्यात आले आणि आयईडी निकामी करण्यात आला.







