अमरावती (प्रतिनिधी) : नांदगाव पेठ येथील एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीतील १०० पेक्षा जास्त कामगारांना विषबाधा झाली आहे. यात महिलांची संख्या जास्त असून महिलांना उलटय़ा आणि मळमळण्याचा त्रास झाला. सर्वांना रुग्णांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सकाळचा नाश्ता किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. अमरावतीत काही दिवसांपूर्वी एका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असताना आता नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीत महिलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी पाणी प्यायल्यापासून उलटय़ा आणि मळमळचा त्रास सुरू झाला आहे. त्याचबरोबर पोट दुखत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. कंपनीत अंदाजे ७०० महिला काम करत असल्याचे म्हटले जात आहे.







