पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : मंचर ता. आंबेगाव येथे पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणार्या नायलॉन मांजामुळे दोघेजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. मांजा वापरावर बंदी असतानाही मंचर शहरात नायलॉग मांजा आला कुठून? याबाबत चर्चा सुरू झाली असून पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन यांची मांजा कारवाईबाबत उदासीनता दिसून आली आहे.
मंचर येथील एसटी बस स्थानक परिसरात दुपारी दुचाकीवर चाललेल्या तरुणाच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने गळ्याला जखम होऊन तरुण जखमी झाला आहे. तरुणाने तत्काळ दुचाकी थांबवल्याने मोठा अनर्थ टळला असून तो थोडक्यात बचावला आहे. तर दुसर्या एका पायी चालणार्या तरुणाच्या हाताच्या बोटांना मांजामुळे जखम झाली आहे. जखमी झालेल्या दोन्ही तरुणांची नावे समजली नाही. मंचर बस स्थानकाच्या जवळपासच्या उंच असलेल्या इमारतींवर पतंग उडवले जात होते. या पतंगापैकी काही पतंग मांजासह तुटून मंचर बस स्थानकाजवळ आल्याने पतंगाच्या मांजाने दोन तरुण जखमी झाले आहे असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
मंचर शहरात सोमवारी पोलिसांनी पेट्रोलिंग करून मांजा विकणार्या दुकानदारांबाबत तपासणी केली होती; परंतु काही गैर मिळाले नाही. मांजा विक्री कोणी करत असेल तर याबाबत कोणाला काय माहिती असल्यास त्यांनी मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
– श्रीकांत कंकाळ, पोलीस निरीक्षक मंचर पोलीस ठाणे.
मकर संक्रांतीच्या सणानिमित्त देशभरात पतंग उडवण्याची परंपरा गेली अनेक वर्षापासून आहे. मात्र पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा धागा हा साधा असावा असा नियम असून, मांजा वापरावर राज्यात बंदी आहे. तरीही मंचर परिसरात पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर दिसून आल्याने लहान मुले, नागरिक, पक्षी, प्राणी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मांजा विक्रीवर बंदी असतानाही मंचर शहरात मांजा कसा आला? पोलीस प्रशासन यांनी पतंगासाठी मांजा विक्री करणार्या दुकानांची तपासणी केली नाही का? केली तर त्यांना मांजा सापडला नाही का? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. तर बंदी असतानाही मांजा विक्री करणार्या दुकानावर कारवाई करण्याचे आदेश असतानाही मंचर पोलीस व नगरपंचायत प्रशासन विभाग फक्त डोळे झाकून पाहत राहिला का? असा प्रश्नदेखील अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.







