पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शिरूर तालुक्यातील करंदी येथे डोंगराला रात्रीच्या वेळी भीषण वणवा लागून आगीमध्ये झाडांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली, मात्र स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला आहे.
करंदी येथे १३ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते राघू नप्ते, गोविंद नप्ते, राजेंद्र ठाकर, रमेश नप्ते, बाळूनाना ठाकर, संदिप ठाकर यांसह आदींनी झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने भर अंधारात आग विझवत आगीवर नियंत्रण आणले.
नागरिकांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली असली तरी आगीमध्ये झाडांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वनविभागाने जंगलातील वणवे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिक करत आहेत.







