छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : माणसातील संवेदनाच मृत झाल्याचा प्रत्यय येथील गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आला आहे. मृतदेहावरील पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने व जखमीच्या खिशातील १३ हजार रुपये चोरीस गेल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात प्रारंभी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर नागरिक व समाजसेवकांनी दबाव निर्माण केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी शिर्डी येथे आले होते. दर्शन घेऊन ते बुधवारी सकाळी जीपमधून वेरूळ लेण्या पाहून व घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन गंगापूरमार्गे शिर्डीला जात असताना रात्री १० वाजेच्या सुमारास तांबूळगोटा फाटा येथे त्यांच्या जीपचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात वैद्विक श्यामशेट्टी (६ महिने), अक्षिता गडकुनुरी (वय २१) व प्रेमलता श्यामशेट्टी (५८) व प्रसन्ना लक्ष्मी (४५) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुरुवारी सकाळी मृतांचे नातेवाईक हे गंगापूर येथे आले असता त्यांना मृतांच्या अंगावर असलेले दागिने आढळून आले नाहीत. त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांना कोणीही माहिती दिली नाही.
यानंतर त्यांनी गंगापूर पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस मात्र टाळाटाळ करत होते. मृतांच्या नातेवाईकांनी समाजसेवक अमोल जगताप, राहुल वानखेडे तसेच शिर्डी येथून मदतीसाठी आलेले अरविंद कोते यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. याप्रकरणी मनीकंठ रमेश श्यामशेट्टी यांच्या फिर्यादीवरून मृत चुलती, भाची यांच्या अंगावरील २ लाख ७० हजार रुपयांचे सोने व श्यामशेट्टी यांच्या खिशातील रोख १३ हजार रुपये चोरी झाल्याची माहिती आहे.







