गोंदिया (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवेगावबांध जवळील एओपी धाबेपवणी या ठिकाणी ही घटना घडली असून, या कॉन्स्टेबलने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही.
गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगांव तालुक्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये माओवाद्यांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एओपी बांधण्यात आल्या आहेत. यादरम्यान नवेगावबांध पोलीस स्टेशनजवळ असलेल्या धाबेपवनी येथील एओपीमधील कार्यरत असलेले हेड-कॉन्स्टेबल पदावर कार्यरत जयराम कारू कोरेट (५० वर्ष रा. संबूटोला/कडीकसा तालुका देवरी जिल्हा गोंदिया, बक्कल क्रमांक २४) यांनी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जयराम कोरेट यांनी आपल्याजवळ असलेल्या AK 47 बंदूकाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. त्यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. काही दिवसांपूर्वीच जयराम कोरेट यांची तिरोडा पोलीस स्टेशन या ठिकाणी बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.







