पोलिस अधिक्षकाच्या सुरक्षारक्षकाचा स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विशाल तुमसरे (वय ५०) या सुरक्षारक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेअर बाजारात लाखो रुपये बुडाल्याच्या नैराश्येतून त्यांनी ही टोकाची पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोद्दार यांच्या खासगी बंगल्यावर घडली.

 

घटनेच्या वेळी तुमसरे हे कर्तव्यावर तैनात होते. मिळालेल्या माहितीनुसार, तुमसरे हे पत्नी आणि दोन मुलींसह एसआरपीएफ कॅम्पजवळील जयताळा परिसरात राहतात. आधी विशाल एसआरपीएफमध्येच कार्यरत होते. २०२३ साली त्यांनी बदली करून घेतली आणि नागपूर ग्रामीण पोलिसात पोलिस हवालदार म्हणून भरती झाले. तेव्हापासून ते मुख्यालयाच्या माध्यमातून पोलिस अधीक्षक पोद्दार यांच्या खासगी निवासस्थान वृंदावन सिटी येथील बंगल्यावर गार्ड ड्यूटीवर तैनात होते.

 

नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्रीही तुमसरे कर्तव्यावर हजर झाले होते. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांनी अचानकच गार्ड रुमध्ये स्वतःची सर्व्हिस रायफल हनुवटीवर ठेवून गोळी चालवली. गोळीच्या आवाजाने पोद्दार यांची झोप उघडली. ते आपल्या सुरक्षा रक्षकासोबत गार्ड रूममध्ये गेले असता विशाल खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळले. बाजूलाच त्यांची रायफल पडलेली होती. पोद्दार यांनी तत्काळ सुरक्षा रक्षकासोबत मिळून तुमसरे यांनी वाहनात टाकले आणि उपचारार्थ एम्स रुग्णालयात घेऊन गेले. तुमसरे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.

गार्डरूममध्ये ठेवलेल्या ड्यूटी रजिस्टरच्या मागच्या पानावर तुमसरे यांनी नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांचे शेअर बाजारात लाखो रुपये बुडाल्याचे नमूद होते. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. आर्थिक अडचणीमुळेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळ हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गत येत असल्याने स्थानिक पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

सुरूवातीला तुमसरे यांनी शेअर बाजारात काही पैसे गुंतविले. त्यावर त्यांना नफा मिळाला. त्यामुळे त्यांनी अधिक पैसे गुंतविण्यास सुरूवात केली. काटकसर करून जमा केलेले पैसेही त्यांनी शेअर बाजारात गुंतविले होते. मात्र, नंतर त्यांना तोटाच होऊ लागला. गेल्या अडीच वर्षांपासून तुमसरे यामुळे तणावात होते. त्यांची मोठी मुलगी दहाव्या वर्गात शिकते. लहान मुलगी सात वर्षांची आहे. त्यांना दोन्ही मुलींच्या भविष्याच्या चिंता सतावत होती. यामुळे ते नैराश्येत गेले होते. अखेर त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनुसार शेअर बाजारात त्यांचे जवळपास 9 लाख रुपये बुडाले आहेत. मात्र, ही रक्कम जास्तही असू शकते. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here