अमरावती (प्रतिनधी) : दर्यापूर तालुक्यात १८ जानेवारीला १३ वर्षीय मुलाने ८ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वीही दर्यापूर तालुक्यात ६५ वर्षीय नराधमाने एका तीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती.
पीडित मुलीला शनिवारी (दि.१८) रात्री अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठ वर्षीय मुलीचे आई-वडिल हे कामावर गेले होते. अशातच विधीसंघर्ष बालकाने आपल्या लहान भावाच्या माध्यमातून आठ वर्षीय मुलीला घरी बोलाविले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीची आई घरी आल्यानंतर तिला हा धक्कादायक प्रकार माहिती पडला. त्यामुळे त्यांनी तत्काळ दर्यापूर पोलिसात तक्रार केली. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीचे शोधकार्य सुरु केले होते.
दरम्यान, मुलीची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारासाठी विलंब होत असल्याने नातेवाईकांनी संतप्त होत निदर्शन केले. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्राम्हणे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रकरण शांत झाले.







