छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : बीएससीचं शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा १७ वेळा वार करुन खून करण्यात आला होता. अखेर या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मावस भावाने मोबाईल गेममध्ये जिंकलेल्या एक लाख रुपयांपैकी ६५ हजार रुपये हरल्याने मावस भावानेच शांत डोक्याने खून केल्याची खबुली दिली आहे. खुनानंतर ”मिस यू”चे स्टेटस ठेवणाराच प्रदीपचा अल्पवयीन मावसभाऊ मारेकरी निष्पन्न झाला आहे.
प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९) हा मुळचा बीड जिल्ह्यातील पिंपरखेड या गावातील रहिवासी होता. तो शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ वर्षापासून राहतो. शहरातील एका नामांकित महाविद्यालयात तो बीएससीचे शिक्षण घेत होता. उस्मानपुरातील रेड कॉलनीत तो ४ मित्रांसोबत भाड्याची खोली घेऊन राहत होता. यात त्याचे २ नातेवाईक होते. मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी सर्व रूम पार्टनर हे वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास रूम पार्टनर रूमवर परतल्यानंतर रूममध्ये प्रदीप हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रदीप निपटे आणि त्याचा अल्पवयीन मावसभाऊ हे दोघेही मोबाईल गेमच्या आहारी गेले होते. दोघेही प्रदीपच्या मोबाईलमध्येच गेम खेळत होते. यात मोबाईल गेममध्ये प्रदीपचा अल्पवयीन मावस भाऊ पटाईत होता. यामुळे त्याने गेममध्ये एक लाख रुपये जिंकले होते. जिंकलेल्या एक लाख रुपयांपैकी ६५ हजार रुपये प्रदीप हरल्याने अल्पवयीन मावस भावाला याचा राग आला. या कारणावरून गेल्या दोन महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. दरम्यानच्या काळात प्रदीपचे महाविद्यालयात तरुणांसोबत खुन्नस देण्यावरून कडाक्याचे भांडण झाले. यावरून मावस भावाने खुनाचा कट रचला. रूम पार्टनर झेरॉक्स काढून येईपर्यंत मकर संक्रांतीच्या सायंकाळी चाकूने तब्बल १७ वार करून प्रदीपची हत्या करण्यात आली.







