तेहरान (वृत्तसंस्था) : इराणमध्ये एका बंदूकधार्याने दोन प्रख्यात न्यायाधीशांची हत्या केली आहे. राजधानी तेहरानमध्ये शनिवारी गोळीबार झाला होता. हल्लेखोराने नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे. इराक आणि इराण युद्धानंतर काही इराक समर्थक गट कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी एखाद्या गटाने त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
इराणमध्ये १९८८ मध्ये देशविरोधी कारवाया केल्या प्रकरणी सामूहिक मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या प्रकरणात न्यायाधीश मोहम्मद मोघीसे आणि अली रजनी यांचा सहभाग मोठा होता. दरम्यान, त्यांच्या हत्येप्रकरणी कोणत्याही गटाने जबाबदारी घेतलेली नाही. यापूर्वी १९८८ मध्ये सामूहिक मृत्युदंड प्रकरणी रजनी यांच्यावर हल्ला झाला होता. तसाच हल्ला १९९९ मध्ये झाला होता. तो अयशस्वी ठरला होता.
अगोदरच इराण अमेरिकेच्या प्रतिबंधामुळे आर्थिक संकटांचा सामाना करत आहे. त्यात इस्रायल आणि हिजबुल्ला दहशतवादी संघटनेतील युद्ध आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे घेणार आहेत. त्या बाबी इराणसाठी चिंताजनक आहेत.त्यात दोन न्यायाधीशांची हत्या झाली आहे. दोन्ही न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात कार्यरत होते, अशी माहिती वृत्तवाहिनीने दिली.







