मित्रांच्या मदतीने प्रेयसीने केली प्रियकराची हत्या

निर्घृण हत्या
File Photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : प्रियकर सतत मानसिक त्रास देत असल्याने प्रेयसीने मित्रांच्या मदतीने हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी गुंडाविरोधी पथकाने या कटात सहभागी असलेल्या तिघांसह महिलेला आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.

 

बालाजी उर्फ बाळू मचक लांडे (वय २८) असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. रेखा विश्वंभर भातनासे असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे. तिच्या अल्पवयीन मुलीला देखील हत्येप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. आधी हे हत्या प्रकरण अपघात आहे असा बनवा रचण्यात आला होता. पण गुंडाविरोधी पथकामुळे आरोपींचा बनाव उघड झाला आहे. हत्या झालेल्या बालाजीचा अपघात झाल्याचा बनाव रचून त्याला वासीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

दरम्यान, आरोपी रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांच्यासह इतरांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नावे सांगितली होती. ही बाब लक्षात येताच पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी समांतर तपास करण्याबाबत सूचना दिल्या. गुंडाविरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पथकातील पोलिस कर्मचार्‍यांनी आजूबाजूचे अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तोच धागा चिखलीतील दुर्वांकुर सोसायटीपर्यंत पोहोचला. सोसायटीच्या लिफ्टमध्ये काही रक्ताचे डाग देखील आढळले. पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. फ्लॅट नंबर ३०३ मध्ये अल्पवयीन मुलगी दिसली. तिला पोलिसांनी विश्वासात घेऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फोटो दाखवला आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचे नाव बालाजी उर्फ बाळू मचक लांडे असे असल्याचे समोर आले आणि तो बीडमधील दिंद्रुडचा रहिवाशी असल्याचे तपासात पुढे आले. तसेच मुलीची आई रेखा विश्वंभर भातनासे आणि इतर चार साथीदारांनी हत्या केली असल्याचे देखील कबूल केले. रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एक टीम बीडला रवाना झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here