डंपर पलटी होऊन २ विद्यार्थिनींचा मृत्यू

डंपर पलटी

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : भरधाव जाणारा रेडिमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याचवेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. प्रांजली महेश यादव (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) या दोन्ही विद्यार्थिनींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. ही घटना हिंजवडी – माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रांजली आणि अश्लेषा या एमआयटी कॉलेजध्ये विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. हिंजवडी – माण रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ बेदरकारपणे वाहन चालवत भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. याचवेळी तेथून चाललेल्या दुचाकीस्वार प्रांजली आणि अश्लेषा या डंपरखाली सापडल्या. या भीषण अपघातात दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

 

 

https://twitter.com/KhaneAnkita/status/1883061976685019389

 

 

पलटी झालेल्या डंपरमध्ये तब्बल ३२ टन सिमेंट भरलेले होते. भरधाव चाललेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि ३२ टनाच्या या बोजाखाली दबल्या गेल्याने दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. छिन्नविछीन्न अवस्थेतील त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहिवरून येत होते.

अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस, वाहतूक पोलीस, आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्याचे काम करण्यात आले. या अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, २२ वर्षीय डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here