जळगाव (प्रतिनिधी राजेंद्र महाजन) : जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेतलेले आणि वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज माफ करण्याचा निर्णय सोमवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच लिपिकांच्या २२० जागा भरण्याचाही निर्णय घेण्यात आला असून १७ फेब्रुवारी रोजी याबाबत विशेष बैठक होणार आहे. हा लाभ फक्त वेळेत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार असून थकबाकीदारांना याचा लाभ मिळणार नाही. मागील आर्थिक वर्षात जिल्हा बँकेने दोन लाख शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले होते.
कर्ज वाटप करताना आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नसणे आणि केवायसीच्या अभावामुळे अडचणी निर्माण होत आहेत. थकबाकीदार शेतकऱ्यांना ओटीएस अंतर्गत मुदतवाढ दिली आहे, तर १ कोटीपर्यंत कर्ज थकीत असलेल्या तीन संस्थांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहरातील ऐतिहासिक दगडी बँक आणि बँकेच्या नाट्यगृहाचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दगडी बँकेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असून उत्पन्नासाठी नवीन पर्याय शोधले जातील. नाट्यगृह बीओटी तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे.
बँकेने अॅग्रीकल्चर हेड अंतर्गत १०० कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली असून हा प्रस्ताव एसबीआयकडे पाठविण्यात आला आहे. तांत्रिक तपासणीनंतरच या कर्जाचा निर्णय होईल. या बैठकीस अध्यक्ष संजय पवार, आमदार अमोल पाटील, एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, अॅड. सतीश पाटील, अॅड. रोहिणी खडसे आणि इतर संचालक उपस्थित होते. त्यांनी विविध उपक्रमांवर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेतले.







