सत्तर हजार रुपयांची हॉस्पिटल बिलात सूट मिळवून देताच रिक्षा चालकाचे कुटुंब गहिवरले!

कांतीलाल कडू यांचा मदतीचा ‘सिलसिला’ सुरूच!

पनवेल/अलिबाग-सोगावकर – कळंबोली येथील विजय काळे नावाच्या रिक्षा चालकाच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. तब्बल 23 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. घरी परतण्याची ओढ लागली. पण बिलाची मोठी रक्कम जवळ नसल्याने अडचण निर्माण झाली आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू मदतीला धावून आले. त्यांनी सत्तर हजार रुपयांची सूट मिळवून देताच काळे यांच्यासह कुटुंबाला गहिवरून आले…!
विजय काळे हे कळंबोलीतील रिक्षा चालक. गेल्या पाच महिन्यात हातावर पोट भरण्याचा व्यवसाय ठप्प. त्यात पायाचे दुखणे वाढले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. आधिच कोविड साथ त्यात ही आपत्ती. परंतु, शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याने हॉस्पिटलला दाखल व्हावे लागले. सुदैवाने त्यांना कोविडची लागण झाली नाही.
घरात साठवलेले पन्नास हजार रूपये हॉस्पिटलला अनामत रक्कम भरली. औषधे बाहेरून आणायला वेगळे पैसे… असे करता करता 23 दिवसांच्या हॉस्पिटलच्या मुक्कामात अख्खं घर हॉस्पिटलभोवती फिरत होते.
घरी परतण्यासाठी डॉक्टरांकडून काही सवलत मिळावी म्हणून त्यांनी कळंबोलीचे माजी सरपंच दिलीपशेठ खानावकर यांना सांगितले. त्यांनी ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्याशी संपर्क साधला आणि चक्रे फिरली.
कडू यांनी डॉक्टरांना संपर्क साधला. हो, नाही म्हणत डॉक्टरांनी 45 हजार रूपयांची सवलत दिली. दोन लाख पस्तीस हजार बिलातून डॉक्टरांनी इतकी सवलत दिल्यानंतरही त्यांच्याकडे उर्वरित रक्कम भरण्यास पैसे कमी पडत असल्याचे त्यांचे सहकारी संतोष शिंदे, संतोष कोळेकर आणि पुन्हा दिलीपशेठ यांनी कडू यांना सांगितले.
तेव्हा पुन्हा चक्रे फिरवून कडू यांनी डॉक्टरांकडून आणखी पंचवीस हजार रूपये कमी करून घेतले. डॉ. शेलार यांनी कोणतीही तक्रार न करता कडू यांच्या शब्दाला मान देवून रिक्षाचालक रुग्णाला तब्बल सत्तर हजार रुपयांची सूट मिळवून दिल्याने कळंबोलीतील समस्त नागरिक कडू यांचे कौतुक करीत आहेत आणि डॉ. शेलार, दिलीपशेठ खानावकर यांचे ऋण व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here