लिधोरा ताल (मध्यप्रदेश) : टिकमगढ जिल्ह्यातील जटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिधौरा ताल गावातवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंतिम संस्कारावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद निर्माण झालाय. दोन्ही भावांमधील वाद इतका विकोपाला गेला की, मोठ्या भावाने वडिलांच्या मृतदेहाचे दोन भाग करायचे ठरवले. अंत्यसंस्काराला जमलेल्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनी दोघा भावांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील दोघा भावांमध्ये वाद हा सुरूच होता.
वाद मिटत नसल्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि दोन्ही भावांना समजावून सांगितले. त्यानंतर वडिलांचे अंतिम संस्कार करता आले. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, लिधोरा ताल येथील रहिवासी ८५ वर्षीय ध्यानी सिंग घोष यांचे सोमवारी सकाळी निधन झाले होते. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा दामोदर याने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली. माहिती मिळताच गावकरी तसेच नातेवाईक त्याच्या घरी पोहोचले.
त्यानंतर दामोदरचे मोठे भाऊ किशन सिंह घोष त्यांच्या मुलासह आणि इतर काही नातेवाईकांसह दामोदरच्या घरी पोहोचले. तेव्हा किशन यांनी वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आग्रह धरला. यावरून दोन्ही सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. दामोदर म्हणाले, ‘वडील माझ्यासोबत राहत होते. मी त्यांची सेवा केली आहे.’
नंतर मोठ्या भाऊ किशनने वडिलांच्या मृतदेहाचे २ भाग करण्याचे ठरवले. जेणेकरून दोघा भावांना स्वतंत्रपणे अंत्यसंस्कार करण्यास मिळेल. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही भावांना समजावून सांगितले. त्यांनतर वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.







