आज दिल्ली विधानसभेसाठी मतदान

मतदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज (बुधवारी) मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडेल. यंदा ६९९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. आम आदमी पक्ष सलग तिसर्‍यांदा एकहाती सत्ता मिळविणार की भाजप आणि काँग्रेस सत्तेत पुनरागमन करणार, हे आज दिल्लीकर ठरविणार आहेत. तर, ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल.

 

दिल्लीत आचारसंहिता उल्लंघनाच्या आतापर्यंत १ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर, विविध कारणांवरुन ३३,४३४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय, दारु, बेकायदा शस्त्रे, अमली पदार्थ, रोकड आणि चांदी जप्त करण्यात आली आहे.

सुमारे १३ हजार ७६६ केंद्रांवर मतदान पार पडेल. त्यातील ३ हजार संवेदनशील केंद्र आहेत. या केंद्रांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, ड्रोनच्या माध्यमातून नजर असणार आहे. एकूण १.५५ कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये ८३.४९ लाख पुरुष मतदार असून ७१.७४ लाख महिला मतदार आहेत. तरुण मतदारांची संख्या २५.८९ लाख असून २.०८ लाख नवमतदार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी ७३३ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. मागील २५ वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपने दिल्ली विधानसभेची सूत्रे हाती घेण्याचा निर्धार केला आहे. तर, १९९८ ते २०१३ या कालावधीत सलग १५ वर्षे दिल्लीवर राज्य करणार्‍या काँग्रेसला मागील दोन निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२० निमलष्करी दलाच्या कंपन्या, ३०,००० पोलिस आणि १९,००० होमगार्ड दिल्लीत तैनात आहेत. दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ५८ जागा सर्वसाधारण असून १२ राखीव आहेत. २०२० मध्ये ६२ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी ‘आप’ने ६२ जागा जिंकल्या होत्या. भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. ‘आप’ला ५३.५७ टक्के, भाजपला ३८.५१ टक्के मते मिळाली होती. मागील निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४.२६ टक्के मते मिळाली होती. २०१५ च्या निवडणुकीत ‘आप’ने ६७ जागा पटकावल्या होत्या. २०१३ मध्ये ‘आप’ने ३१ जागांवर विजय मिळविताना काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. मात्र, ते फार दिवस टिकू शकले नव्हते. १९९८ पासून भाजपला दिल्ली विधानसभेत सत्ता मिळविता आलेली नाही. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपचे खासदार निवडून येत आहेत. मात्र, विधानसभेत भाजप निष्प्रभ ठरत आहे. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here