सायबर भामट्यांनी शेअर गुंतवणूकदाराला घातला तब्बल दीड कोटींला गंडा

cyber-thief
file photo

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : शेअर खरेदी विक्रीतील गुंतवणुक करण्यास भाग पाडून सायबर भामट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या इसमास तब्बल दीड कोटींना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गुंतवणुकदाराशी अयन्ना जोसेफ व रेतुरत्नम रवी या भामट्यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात संपर्क साधला होता. शेअर मार्केटची माहिती देत संशयितांनी वेगवेगळया नावाच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये तक्रारदारचा समावेश केला. या ग्रुपमधील सदस्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याच्या संदेशाला भूलून ही फसवणुक झाली. सायबर भामट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या तक्रारदारानेही काही रकमा संशयितांच्या सांगण्यानुसार अन्य बँक खात्यात वर्ग केल्या. त्यानंतर भामट्यांनी आदित्य बिर्ला मनी लि. या कंपनीचे नाव वापरून बनावट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅपमध्ये तक्रारदाराच्या नावाने वेगवेगळया कंपनीचे शेअर्स खरेदी करीत असल्याचे भासविले. त्यामुळे तक्रारदार यांचा विश्वास बसला.

 

या घटनेत तक्रारदारास ४१ लाख ६९ हजार ८५१ रूपये भरण्यास भाग पाडण्यात आले. कालांतराने गुंतवणुकीत मोठी रक्कम असल्याने तक्रारदाराने विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅपीटल गेन टॅक्स आणि सर्व्हीस टॅक्स बाबत त्यांना मेल आणि व्हॉटसअपवर नोटीस धाडण्यात आली. यासाठी आदीत्य बिर्ला मनी लि. या कंपनीचे बनावट लेटर हेड वापरण्यात आले. भामट्यांकडून तक्रारदारास टॅक्सपोटी अनुक्रमे ८१ लाख ६१ हजार ८४७ व सात लाख रूपये भरण्यास भाग पाडण्यात आले. मात्र त्यानंतरही गुतवणुकीसह नफ्याची रक्कम अदा न झाल्याने तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here