कानपूर (उत्तरप्रदेश) : येथील महाराजपूरमध्ये २७ जानेवारीला एक १२ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात कुटुंबियांनी दाखल केली होती. बेपत्ता झाल्याच्या ३ दिवसानंतर तिचा मृतदेह झुडपात सापडला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं.
या घटनेबाबत माहिती देत डीसीपी श्रवण कुमार म्हणाले, अल्पवयीन मुलगी शेळ्या घेऊन शेतात गेली होती. मात्र, घरी आल्यानंतर तिच्या लक्षात आले की, एक शेळी गायब आहे. त्याच एक शेळीच्या शोधात ती पुन्हा शेतात गेली, मात्र पुन्हा परतलीच नाही. नंतर मुलीच्या कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर मुलीच्या वडीलांच्या मित्रावर पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी आरोपी मुलीच्या वडीलांचा मित्र अर्थात उदयभानच्या कपड्यांची बेंझिडाइन चाचणी केली. तेव्हा आरोपीनं गुन्हा कबूल केला. आरोपीनं सांगितले, ‘जेव्हा मुलगी शेळी शोधायला गेली होती, तेव्हा मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीनं मी वडीलांचा मित्र असल्याचं ओळखलं. वडीलांना याची माहिती देईन असं तिनं सांगितलं. यामुळे मुलीची गळा आवळून हत्या केली’. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर कोर्टात नेऊन शिक्षा दिली जाईल असं डीसीपींनी सांगितलं.







