सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका ४ वर्षीय चिमुकलीचा खून केल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपीला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
करजगी गावाचा आज बाजार असल्याने चार वर्षांची चिमुकली याची शाळेत जाण्याची वेळ झाल्यानंतर आजूबाजू तिचा शोध घेत होते पण तिचा काही तपास न लागल्याने गावात दवंडी देऊन सुद्धा त्या मुलीचा तपास न लागल्याने ही माहिती गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थांनी उमदी पोलीस स्टेशनला कळवली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांना तिथेच काही अंतरावर पत्राच्या शेडसमोर बदामाच्या झाडाखाली सदर संशयित आरोपी हा दारूच्या नशेत झोपलेला आढळून आला. त्या संशयित नराधमाला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्याने मुलीला खेळण्याचं आमिष देऊन गावानजीक असलेल्या आपल्या पत्रा शेडमध्ये घेऊन गेला आणि त्या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली दिली आहे.
घराची झडती घेतली असता पेटीमध्ये पोते दिसले. पोत्यावर डाग असल्याने उघडून पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळला. गावकऱ्यांनीही धक्कादायक प्रकार समजताच घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जत रुग्णालयात पाठवला आहे. संशयितांने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, त्याने हा खून कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपास सुरु असून या घटनेची सायंकाळपर्यंत कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही.







