बिजापूर (छत्तीसगढ) : जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी रविवारी मोठी मोहीम राबविली. चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले आहेत. आहे. दोन जवान हुतात्मा झाले आहेत. दरम्यान, कालच्या कारवाईसह या वर्षात एकूण ८१ नक्षलवादी चकमकीत ठार झाले आहेत.
जंगलातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात ६५० पेक्षा अधिक सुरक्षा रक्षकांनी विविध भागांतून एकाच वेळी काल कारवाई केली, अशी माहिती उप मुख्यमंत्री विजय शर्मा यांनी दिली. नक्षलवाद्यांचा गट इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काल सकाळी विविध सुरक्षा पथकाने संयुक्तपणे कारवाईस सुरूवात केली, अशी माहिती बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी, सुंदरराज यांनी दिली.
संयुक्त पथकात जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल आणि बस्तरचे योध्ये, राज्य पोलिसांच्या सर्व विभागांचा समावेश होता. नक्षलवादी लष्करी पोषाखात आणि शस्त्रास्त्रासह होते. कारवाईत घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. त्यात एके -४७, इन्सास, एसएलआर आणि ३०३ रायफली, स्फोटके आणि बॅरेल ग्रेनेड लाँचरचा समावेश होता. चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले आहेत. त्यात जिल्हा राखीव दलाचा आणि विशेष कृती दलाच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रायपूर येथील रुग्णालयात हवाई मार्गाने हलविले आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. कारवाईवेळी जवान जखमी झाल्याचे समजताच मदत पथक घटनास्थळी तातडीने रवाना करण्यात आले होते.







