डेर अल बलाह (इस्त्राइल) : हमास दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलच्या आणखी तीन ओलिसांची सुटका केली. त्यांना रेडक्रॉसकडे सोपविले आहे. हमास आणि इस्रायल यांच्यात झालेल्या करारानुसार त्या बदल्यात पॅलेस्टिनी कैद्यांचीही सुटका इस्रायलने केली आहे.
नागरिकांची सुटका हमासने केल्याच्या वृत्ताला इस्रायलच्या सैन्याने दुजोरा दिला. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नातेवाईकांकडे सोपविले जाणार आहे. सुमारे १६ महिन्यांनंतर त्यांची सुटका झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, एली शराबी (वय ५२); ओहद बेन अमी (वय ५६) आणि ओर लेव्ही (वय ३४), अशी सुटका केलेल्या इस्रायलच्या नागरिकांची नावे आहेत. सर्वजण हमास दहशतवाद्यांच्या सुरक्षेत एका पांढर्या मोटारीतून आले. डेअर अल बलाह शहराजवळच्या महामार्गावरील एका ठिकाणी त्यांना रेडक्रॉसच्या ताब्यात दिले.
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. तेव्हा त्यांच्यासह अन्य इस्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, ओलिसांच्या सुटकेचा हा पाचवा टप्पा होता. कालपर्यंत एकूण १८ ओलिसांची आणि त्या बदल्यात ५५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येण्यापूर्वी हमासने युद्धबंदी करार करावा, अशी धमकी दिली होती.







