जालना (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुना गावात आकाश जाधव (वय २१) या तरुणाला जिवंत जाळून गावाच्या गायरान भागात फेकल्याची घटना घडली आहे.
आज (दि.९) दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह गावातील गायरान जमिनीमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळून आलाय. दरम्यान, या तरुणाला कोणी जाळलं, कशासाठी जाळलं? याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. घटना उघडकीस आल्यानंतर जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. या घटनेतील आरोपीस शोधून त्याला जेरबंद करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मयत आकाश जाधव याच्या नातेवाईकांनी केलीय.
दरम्यान, वर्ध्यामध्ये देखील हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्याच्या वादातून दोन भावंडांनी १७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव (माथनकर) येथे घडली. हिमांशू किशोर चिमणे (वय १७ वर्ष, रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट) असं मृत मुलाचं नाव आहे. या प्रकरणी तक्रारीवरून मानव धनराज जुगनाके (वय २१) आणि अनिकेत धनराज जुगनाके (वय २३) या दोन्ही भावांवर हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.







