शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या
अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक अन्नपूर्णा लॉन येथे संपन्न झाली. करोना संकटाच्या काळात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना गणेश मूर्ती स्थापने पासून ते विसर्जनापर्यंत शासनाकडून काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. या नियमांचे सर्व समाज बांधवांनी काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.कोरोना विषाणू हा अतिशय घातक असून संपूर्ण जगाला त्याचा परिणाम भोगावा लागत आहे व सध्या तरी त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हा एकमेव उपाय आहे . म्हणून गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस विभाग शहादा यांच्याकडून शांतता कमिटीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.
बैठकीदरम्यान सुरुवातीला उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विक्रम कदम यांनी येणाऱ्या काळात साजरे होणारे सण-उत्सव हे शांततापूर्ण पद्धतीने साजरे व्हावे यासाठी परिपत्रकातील काही नियमांचे स्पष्टीकरण केले. गणेश मूर्ती चार फुटांपेक्षा उंच नसावी, मिरवणुकीस बंदी,प्रतिबंधित क्षेत्रात गणेश मूर्ती स्थापनेस बंदी याविषयी माहिती दिली.यानंतर काही नागरिकांनी गणेशोत्सवासाठी प्रशासनासमोर सूचना मांडल्या.तसेच यापुढील सर्व सण-उत्सव हे शांततेत पार पडतील अशी ग्वाही देण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री महेंद्र पंडित यांनी एक शहर एक गणपती संकल्पनेला सर्व गणेश मंडळांनी मान्यता द्यावी ही अपेक्षा व्यक्त केली. सर्व गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना न करता समाजपयोगी विधायक उपक्रम राबवावेत जेणेकरून कोरोना संकटात असणाऱ्या जनतेला त्याची मदत होईल. जसे की रक्तदान शिबिर, मास्क व सॅनिटायझर वाटप, गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे वाटप इ. समाजोपयोगी उपक्रम राबवता येतील. अशा उपक्रमांतून समाजसेवा घडून अनेकांचे प्राण वाचवता येतील. यासाठी सर्व तरुण पिढीने पुढे येणे गरजेचे आहे. यापुढील सर्व सण-उत्सव हे शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करून साजरे करावेत असे आवाहन पोलीस प्रशासन यांच्याकडून करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी चेतन सिंग गिरासे व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याकडून देखील जनतेला गणेशोत्सव साजरा करतांना सोशल डिस्टंसिंगचे व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.या शांतता समितीच्या बैठकीला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली व त्यांचे मत व्यक्त केले. बैठकीसाठी श्री.मोतीलाल तात्या पाटील, मकरंद पाटील, अरुण आप्पा चौधरी , अभिजीत पाटील ,नूरभाई नुरानी, अरविंद अण्णा कुवर ,प्रा. एल .एस. सय्यद इ. मान्यवर उपस्थित होते. तसेच सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व नागरिक बैठकीसाठी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शहादा पोलीस निरीक्षक श्री. किसन नजन पाटील यांनी व्यक्त केले.







