शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : पोलिस आणि गुन्हेगारांचे लागेबांधे आहेत. शिर्डीतील ८८ दारू अड्डे असून त्यात एका पोलिसाची पार्टनरशिप आहे. पोलिसांनी शिडी नासविली असून तेच गुन्हेगारांचे आका असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी केला. साईभक्तांची लूट करणाऱ्या परप्रांतीयांना थारा देऊ नये असे आवाहन करतानाच माजी नगराध्यक्ष अभय शेळके यांनी शिडींच्या चौहूबाजूने पोलिस चौक्या सुरू करण्याची मागणी केली. शिडीत वार्ड सुरक्षादल स्थापन करण्याचा निर्णयही सोमवारी निषेध सभेत करण्यात आला.
शहरात झालेल्या साईबाबा संस्थानच्या कामगारांच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय ग्रामस्थांची ग्रामसभा सोमवारी (रात्री झाली. माजी नगराध्यक्ष कैलास कोते व अभय शेळके, तसेच शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, राजेंद्र गोंदकर, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, नगरसेवक सुजित गोदकर, मंगेश त्रिभुवन, नितीन कोते, सचिन तांबे, नगरसेवक सुरेश आरणे, दीपक वारुळे सचिन शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे, पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्यासह नगरपरिषद, साईबाबा संस्थान, पोलिस, दारूबंदी खाते, परिवहन खाते अशा विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
कैलास कोते म्हणाले, की शिडॉ शहरात गुंडगिरी, गुन्हेगारांच्या टोळ्या, अवैध धंदे, अवैध दारू व्यवसाय, वेश्याव्यवसाय वाढले आहेत. पोलिसांकडून कारवाया होत नसल्याने गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी. ग्रामस्थांना विश्वास देऊन साईभक्तांची सुरक्षा वाढविण्याचा प्रयत्न करावा. शहरात वाढलेली गांजा विक्री, अपे रिक्षा आर्दीसह विविध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. परराज्यातील लोक देखील मोठ्या प्रमाणावर वाढले असून, त्यांची मतदारातयादीत नावेदेखील आली आहेत. वाढलेली ही संख्या रोखण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे.
पोलिसांवरील विश्वास आता उडाला
माजी नगराध्यक्ष अभय शेळके म्हणाले, शिर्डीत ८० टक्के लोक परप्रांतीय असून त्यांना स्थानिक व्यावसायिकांनी जागा देऊ नये. पॉलिसवाले आणि रिक्षा चालकांनी साईभक्तांची लूट केल्यास त्याची गय करणार नाही, असा सज्जड इशारा माजी नगराध्यक्ष अभय शेळके यांनी दिला, पोलिस हे शिर्डीत साईभक्त व नागरिकांच्या रक्षणासाठी असल्याचे सांगत पोलिसांवरील विश्वास आता उडाला आहे. तो परत आणण्याची जबाबदारी पोलिस उपअधीक्षक शिरीश वमने. पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांची आहे. आजची एकजूट हीच शिर्डीकरांची ताकद आहे. शिर्डी आणि परिसरातील नागरिक सोडून कोणी रस्त्यावर दिसला तर त्याचे वाईट परिणाम दिसतील. शिर्डीतील श्रीरामनगर, गणेशवाडी, बसस्थानक आणि कालिकानगर या चार ठिकाणी पोलिस दूरक्षेत्र सुरू करण्याची मागणी यावेळी शेळके यांनी केली. पोलिस रात्रभर गस्त घालतात, पण साईबाबा संस्थानचीही जबाबदारी आहे. शिर्डीत थांबलेले साईभक्त असून त्यांच्या सुरक्षेसाठी संस्थानचे चार वाहनातून चोहोबाजूने गस्त घालावी, अशी सूचना शेळके यांनी केली.
शिवसेनेचे नेते कमलाकर कोते म्हणाले, की वाढलेल्या टोळ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे. पोलिसांनी हप्ते घेणे बंद केले तर ही गुन्हेगारी सहजपणे रोखता येईल. १४ वर्षांपूर्वी शिर्डीत प्रवीण गोदकर, रचित पाटणी या दोन तरुणांचा बळी गेला होता. साई मंदिर सुरक्षा पोलिस भाविकांना सुरक्षा देत नसतील तर काय फायदा, माजी नगरसेवक सुरेश आरणे म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी शिर्डी शहरात गांजाची रेड झाली. त्यात आर्थिक तडजोड झाली.
नगरसेवकांनी गुन्हेगारांसाठी पोलिस ठाण्यात फोन करू नये. गुन्हेगारांना पाठिशी घालू नये, अशी विनंती करणारे पत्र हनुमान मंदिरात ठेवलेल्या पेटीत टाकण्याचा उल्लेख सभेत करण्यात आला. पोलिसांना शिर्डीत गुन्हेगारीचा बीमोड करणे शक्य नसेल तर त्यांनी पोलिस ठाण्याला कुलूप लावून घरी बसावे, अशा शब्दांत ग्रामस्थांनी पोलिसांच्या कारवायांवर नाराजी व्यक्त केली.
ठाण्यात एक बावा नावाचा कर्मचारी बसला असून तो लाखो रुपयांची तडजोड करत असल्याचा आणि तो गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे. साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपरिषद, शिर्डी पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई करून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शहरात रात्री ११:३० ते पहाटे पाचपर्यंत पूर्णपणे बंद असला पाहिजे, तरच गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊ शकते. सीसीटीव्हींचा फायदा होत नसून शिर्डी शहरात बांगलादेशीदेखील राहत असल्याचा आरोप त्यांनी केला.
एका महिलेने सांगितले, की माझी नववीत शिकणारी मुलगी पंचवीस दिवसांपासून बेपत्ता असून शाळेत गेली ती अजूनही परत आलेली नाही. माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी देखील अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, संस्थानच्या कामगारांसाठी ड्रेस कोड करावा, अशी मागणी केली. दरम्यान, या सभेपूर्वी शिर्डी शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला.







