अमरावती (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर सतत ६ महिने अत्याचार केला. या अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील एका शेतात मध्यप्रदेश येथील परिवार रखवालदारीचे काम करतो. त्या शेताच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या शेतात त्यांच्या गावालगत असलेल्या गावातील कुटुंब राहते. या कुटुंबातील सुदर्शन उईके (वय २५ रा. मध्यप्रदेश) हा तरुण अल्पवयीन मुलीच्या झोपडीत येत होता. गावालगतचा असल्याने ती सुद्धा त्याच्यासोबत बोलत होती. मागील वर्षी आरोपी उईके ऑगस्टमध्ये तिच्या घरी आला, घरी कुणी नसताना ‘तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करतो’, असे म्हणून त्याने त्या मुलीवर अत्याचार केला.
त्यानंतर तो वारंवार तिच्या घरी येत होता. त्यामुळे ती तरुणी गर्भवती राहिली. याबाबतची माहिती तिने आईवडिलांना दिली. त्यानंतर याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सुदर्शन उईके याचे विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.







