ठाणे (महाराष्ट्र राज्य सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : दिनांक २२/०२/२०२५ ते दिनांक ०१/०३/२०२५ दरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, फुलबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, तायक्वांदो, वु-शु, ज्युदो, कुस्ती, बॉक्सींग, हॉकी, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डिंग, क्रॉसकंट्री व जलतरण अशा १८ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. सदर स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण १३ संघ सहभागी झाले असून त्यात २३२३ पुरुष व ६०६ महिला खेळाडू असे एकूण २९२९ खेळाडूंनी भाग घेतला आहे.
स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची एम. एम. आर. डी. ए. क्वॉटर्स, भाईंदरपाडा येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्पर्धा साकेत पोलीस परेड ग्राऊंड, मुख्यालय येथील जुने परेड ग्राऊंड, साकेत येथील हेली पॅड, सिध्दी हॉल व रहेजा गार्डन ठाणे स्पोर्ट क्लब येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेचे साखळी सामने दिनांक २२/०२/२०२५ रोजी पासुन सुरू झाले असून, आजतागायत हॉकी (पुरूष), फुटबॉल (पुरूष), खो-खो (महिला व पुरूष), कबड्डी (महिला व पुरुष), रेसलिंग (महिला व पुरुष), बॉक्सींग (महिला व पुरूष), तायक्वांदो (महिला व पुरूष), पॉवर लिफ्टींग (महिला व पुरूष), व्हॉलीबॉल (महिला व पुरुष ) असे साखळी सामने झाले असून सदर खेळांचे अंतिम सामने होणे बाकी आहे. या व्यतिरिक्त उर्वरित खेळ दिनांक २५/०२ / २०२५ रोजी पासून सुरू होणार आहेत.
स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाव्दारे क्रीडा रसिकांना स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी https://youtube.com/@cpthanecity?si=2jLxYJoKSU3YbLRH अन्वये युटयुब लिंक तयार करण्यात आली असून, ती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचल्यास लोकांना सदर स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक २७ फेब्रुवारीला सायंकाळी १७.०० वा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेचा समारोप १ मार्चला दुपारी ०३.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना..देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सदर वेळी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या प्रमुख, पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.







