सदऱ्यावर मानेच्या बाजूला किडे पडल्याची थाप मारून दिवसाढवळ्या वृद्धाला लुटले; बॅगसह पोबारा

crime
file photo

ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वन्नम) : पश्चिम डोंबिवलीतील सुभाष रोडला गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाला ३५ वर्षीय चोराने लुटले. सदऱ्यावर मानेच्या बाजूला किडे पडल्याची थाप मारून चोरट्याने वृद्धाच्या हातातील पैशांची बॅग बाजूला ठेवण्यास सांगितले. सदरा काढण्यात मग्न असल्याचा फायदा उचलून चोराने या वृद्धाच्या पैशाच्या बॅगसह पोबारा केला.

लूट झालेल्या वृद्ध पांडूरंग बाळाजी सुर्वे (वय ७५) डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा परिसरात राहणारे आहेत. लुटीचा प्रकार डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ पोळीभाजी केंद्रासमोर घडला. यासंदर्भात पांडुरंग सुर्वे यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. डोंबिवलीत दिवसाढवळ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

तक्रारदार पांडुरंग सुर्वे यांनी डोंबिवली पश्चिमेतील एका बँकेमधून तीस हजार रूपये काढले. बँकेची कामे झाल्यानंतर घरातील किराणा भरण्याच्या कामासाठी सुर्वे एका दुकानादाराकडे सुभाष रोडने पायी जात होते. इतक्यात स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्रासमोर एका ३५ वर्षीय इसमाने हाक मारून थांबविले. तुमच्या मानेवर मागील बाजुस बारीक किडे पडले आहेत. त्या किड्यांचा तुम्हाला त्रास होईल. सदरा खराब होईल, अशी भीती सदर इसमाने घातली. तुम्ही सदरा काढा. आपण सदरा पाण्याने धुऊन काढू. इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पांडुरंग सुर्वे सदरा काढण्यासाठी हातामधील बॅग बाजुच्या एका खुर्चीवर ठेवली. सदरा काढण्यात मग्न असताना संधीचा गैरफायदा घेऊन, सुर्वे यांना बोलण्यात गुंतवून चोरट्याने खुर्चीवर ठेवलेली पैशांच्या बॅगसह पोबारा केला.

सदरा काढल्यावर इसम बॅग घेऊन कोठे गेला म्हणून पांडुरंग सुर्वे यांनी आजुबाजुला पाहिले तोपर्यंत चोर पळून गेला होता. पांडुरंग सुर्वे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here