पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : धुळवडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मुंढवा परिसरात छापा कारवाई करून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले आहे. त्यांच्याकडून तब्बल १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. प्रमोद सुधाकर कांबळे (वय ४४, रा. करमाळा, जि. सोलापूर), विशाल दत्ता पारखे (वय ४१, रा. मोहननगर,आदित्य सोसायटी, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी कांबळे आणि पारखे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. पोलिसांनी सापाळा लावून कांबळे आणि पारखे यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात अलाी. त्यांच्याकडून १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला.
आरोपी गांजा कोणाला देणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गांजा, मेफड्रोन विक्री, तसेच तस्करी करणाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.







