हिंगोली (जिल्हा क्राइम रिपोर्टर विष्णु हनवते) : वसमत ते मालेगाव मार्गावर वाळूचा ट्रक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफीयांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एक तलाठी गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीने उपचारासाठी वसमत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.१८) रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातून अवैधरित्या होणारा वाळू उपसा व वाहतुक थांबविण्यासाठी महसूल विभागाने पथके स्थापन केली आहेत. या पथकांकडून दिवसा कामकाज करून रात्रीच्या वेळी वाळू घाटाच्या परिसरात तसेच वाहतूक मार्गावर गस्त घातली जात आहे. यावेळी वाहनांची तपासणी केली जात असून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्रीच्या सुमारास तलाठी नागनाथ राऊत, गजानन नागोरे व दोन कोतवाल असे चौघे जण वसमत ते मालेगाव मार्गावर गस्तीवर होते. यावेळी एका ट्रकमधून वाळू वाहतूक होत होती. पथकाने ट्रक चालकास थांबण्याचा इशारा केल्यानंतरही त्याने ट्रक पळविला. त्यामुळे यापथकाने पाठलाग सुरु केला. यावेळी ट्रक चालकाने निळा (जि. नांदेड) शिवारात ट्रक थांबविला. यावेळी पाठलाग करणाऱ्या पथकाला तेथे थांबलेल्या काही वाळू माफीयांनी घेरले.
यावेळी वाळू माफीयांनी मागचा पुढचा विचार न करता तलाठी राऊत यांच्यावर हल्ला चढविला. बेल्ट, वायर तसेच लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली. मात्र यावेळी तलाठी नागोरे व इतर दोघांनी माफीयांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर वाळू माफीया फरार झाले. या मारहाणीत राऊत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी वसमतच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी राऊत यांची भेट घेऊन चौकशी केली आहे. ही घटना नांदेड जिल्हयातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असून वसमत पोलिसांनी या घटनेची माहिती भाग्यनगर पोलिसांना कळविली आहे. वाळू माफियांकडून होणाऱ्या हल्यामुळे महसूल पथकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.







