जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना होत असल्यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मोटारसायकल चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी संदिप गावित यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असतांना संशयितांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शनिवार (दि.१६) ला पोउपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, रविंद्र चौधरी, पोना प्रदीप चौधरी, पोकाँ रतन गीते, पोकाँ सिध्देश डापकर, जेकश हटकर हे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असतांना त्यांनी तीन संशयितांना थांबण्याचा इशारा दिला असता, त्यांनी पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांचेकडील मोटारसायकलींसह त्यांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलिसांनी मुबीन शाह शकील शाह (वय २०, रा.चमन नगर, मालेगाव, जि.नाशिक), दानिश शाह जहीर शाह (वय २०, रा.गांधीनगर मालेगाव, जि.नाशिक), अमीर उर्फ अमीन शाह जहून शाह (वय २२, रा.भिस्ती मोहल्ला, शाहू नगर, जळगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांच्याजवळील मोटारसायकली मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेली असल्याची माहिती मिळाली. या तिघांनाही एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं/७०/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे अटक करुन, पोलीस कोठडीत विचारपूस केली असता त्यांच्याकडून एमआयडीसी, जिल्हा पेठ, मालेगाव येथे केलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे ४ गुन्हे उघडकीस आले.
आरोपितांकडून वरील गुन्ह्यात चोरलेल्या ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ४ मोटारसायकली ताब्यात घेण्यात आल्या. तसेच आरोपींवर आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये एका इसमास जीवे मारण्याच्या प्रयत्नाखाली दि. १३ माच्र २०२५ रोजी गुन्हा दाखल असल्याचेही समजले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोना प्रदीप चौधरी, पोकाँ रतन गीते करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.







