ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) : एमबीए आणि एमएच सीईटीसह अन्य राज्यांतील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांचा तपशील चोरून त्या उमेदवारांचे पर्सेंटाइल वाढवून देण्यासाठी १५ ते २० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी दिल्ली येथून चार उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना अटक करण्याचा प्रकार घडला आहे. प्रवेश परीक्षा यंत्रणांकडून उमेदवारांचा तपशील फुटण्याचा धक्कादायक प्रकार या घटनेमुळे उघडकीस आला आहे. हे रॅकेट महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सुरू होते.
गेल्या काही दिवसांपासून या रॅकेटमधील आरोपी दिल्ली येथून महाराष्ट्र, गुजरात, बिहार, राजस्थान तसेच अन्य राज्यांमधील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांचा डाटा हस्तगत करून त्यांच्याशी मोबाईलवरून थेट संपर्क साधत असे. व्हाॅट्सॲपद्वारे ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल करून या उमेदवारांना नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पर्सेंटाइल वाढवून देण्याचे आश्वासन दिले जात असे. त्यासाठी १५ ते २० लाख रुपयांची मागणी केली जात असे.
Mumbai: Police Crime Branch has arrested four highly educated individuals from Delhi for allegedly rigging the Maharashtra CET and other state government exams. The accused contacted around 72 students, promising them admission in top Mumbai colleges in exchange for ₹15-20 lakh pic.twitter.com/RVhgam6VvR
— IANS (@ians_india) March 22, 2025
पर्सेंटाइल वाढवून देण्यासाठी शासकीय प्रवेश परीक्षांची सिस्टिम हॅक केली जात असल्याचेही उमेदवारांना सांगितले जात असे. या प्रकारचे फोन कॉल येत असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून महाराष्ट्र राज्य सीईटी विभागाकडे करण्यात आल्या होत्या. तपासात पोलिसांनी उमेदवारांना आलेल्या आरोपींच्या मोबाईल फोन कॉलचे तांत्रिक विश्लेषण करून त्याआधारे शनिवारी पहाटे दिल्ली येथून चार आरोपींना अटक केली. या आरोपींकडून पाच ॲपलचे मोबाईल फोन, एक ॲपल मॅकबुक, एक ब्ल्यूटुथ हेडफोन आणि ६४ जीबीचा एक पेन ड्राइव्ह अशी सामग्री जप्त केली आहे. या आरोपींनी प्रवेश परीक्षा व्यवस्थेची यंत्रणा हॅक केली होती का, त्यांना तिथले काही कर्मचारी सामील होते का की ते फसवणूक करीत होते याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
पोलिस उपयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुनील चंद्रमोरे, वरिष्ठ निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक सुनीता भोर, सहाय्यक निरीक्षक जयादीप जाधव, उपनिरीक्षक विजय बेंडाले, सुजीत घाडगे यांनी या तपासात सहभाग घेतला.
महाराष्ट्रात तब्बल ७२ विद्यार्थ्यांना असे फोन कॉल आले होते. यामुळे प्रवेश परीक्षांची विश्वासार्हताच पणाला लागल्याने राज्य सीईटी विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेत त्याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष पाचकडून आझाद मैदान पोलीस ठाण्यात १८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण बीएससी (बायोलॉजी) शिक्षण घेतलेला आहे. दोघे एनआयटी दिल्ली येथे तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत तर तिसरा आरोपी युपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे.







