ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई : १०८ मोबाईल नौपाडा पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत

नौपाडा पोलिसांनी

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हरविवेल्या चार कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नागरिकांना पुन्हा दिला आहे. यामध्ये सोने-चांदीचे दागिने, रोकड, दुचाकी, मोबाईल यांसारख्या वस्तूंचा सामावेश आहे. तर ठाणे शहरातील नौपाडा पोलिसांनी २०२२ ते २०२५ पर्यंत चोरीला गेलेले १०८ मोबाईल तक्रारदारांना परत मिळवून दिले आहेत. वस्तू परत मिळताच, अनेकजण भावनिक झाले होते.

 

ठाणे ग्रामीण पोलिसांनी विशेष कौशल्य वापरुन विविध चोरीची प्रकरणे उघडकीस आणून तब्बल चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आला. शहापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात हा हस्तांतरण सोहळा पार पडला.

ठाणे ग्रामीण पोलिसांनी विविध तपास पथके तयार करुन सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार यांच्या आधारे मुदतीत तपास करुन सदरचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्या गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन एकुण चार कोटी सहा लाख ९२ हजार ८३९ रुपये किंमतीचे सोने, चांदी, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी यांसह अनेक मौल्यवान वस्तूंचा मुद्देमाल जप्त केला. यात ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. डी.एस.स्वामी, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे, गणेशपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे, मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे यांसह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

तर ठाणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौपाडा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात २०२२ ते २०२५ या कालावधीत गहाळ झालेले १०८ मोबाईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले. मोबाईल मिळताच अनेकांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here