सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : कलेढोण, ता. खटाव येथे पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. सुमन उर्फ मंगल संतोष जाधव (रा. कलेढोण, ता. खटाव) असे तिचे नाव आहे. तर संतोष सखाराम जाधव (मूळ राहणार नरसिंगपूर ता. वाळवा, सध्या रा. कलेढोण, ता. खटाव) असे संशयित पतीचे नाव आहे. याप्रकरणी मायणी पोलिस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयिताला इस्लामपूर (जि. सांगली) येथून अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, आरोपी संतोष जाधव हा पत्नी सुमनसह कलेढोण येथील सासरवाडीत राहण्यास होता. मोलमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे वारंवार त्यांच्यात खटके उडत होते. बुधवार दि. १९ रोजी रात्री नऊच्या सुमारास संतोष आणि सुमन यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी सुमनचा भाऊ प्रशांत माने व त्याची पत्नी उषा यांनी हा वाद मिटवला होता. परंतु काही वेळानंतर रागाच्या भरात संतोषने सुमनचा गळा आवळून खून केला आणि तिथून पलायन केले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशांतला सुमनच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता सुमन निपचित पडल्याची दिसली. त्यांनी मायणी पोलिसांना याघटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. पोनि घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रांत पाटील यांच्यासह प्रवीण सानप, गणेश शिरकुळे, सत्यवान खाडे, कुंडलिक कटरे, बापू शिंदे, नाना कारंडे, संदीप खाडे, पोलिस पाटील सचिन शेटे-पाटील यांच्या टीमने संतोषला इस्लामपूर येथून अटक केली आहे.







