बंगळुरू (कर्नाटक) (वृत्तसंस्था) : येथे पूर्व प्राथमिक शाळा चालवणाऱ्या शिक्षिकेने विद्यार्थीनीच्या वडिलांना जाळ्यात अडकवून त्याच्याशी प्रथम शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर त्याचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, पोलिसांनी याप्रकरणी शिक्षिकेविरोधाच गुन्हा दाखल केला असून तिच्यासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी श्रीदेवी रुडागी हिची बंगळुरूच्या महालक्ष्मी लेआऊटमध्ये पूर्व प्राथमिक शाळा आहे, व तिचे दोघे सहकारी गणेश काळे आणि सागर मोरे (सर्व रा.विजयपुरा) हे सहआरोपी आहेत. ती २०२३ मध्ये पीडित राकेश वैष्णव यांनी आपल्या मुलीचे त्या शाळेत अॅडमिशन केल्यानंतर दोघे संपर्कात आले.
श्रीदेवी आणि राकेश या दोघांमधील संवाद वाढून त्यांची चांगली मैत्री झाली होती. राकेशने श्रीदेवीला २ लाख रुपये उधार दिले होते. हे उधारीचे पैसे तिने २०२४ मध्ये परतवण्याचे वचन दिले. यानुसार त्याने जानेवारी २०२४ आपले पैसे परत मागितले. पण श्रीदेवीने टाळाटाळ केली आणि त्याला पैशांच्या बदल्यात शाळेत पार्टनर म्हणून काम करण्याचे सुचवले. त्यांच्यातील संवाद आणखी घट्ट होत गेला. राकेशने तर तिच्याशी बोलण्यासाठी नवा मोबाईल आणि सीम कार्ड देखील खरेदी केले.
दरम्यान राकेशने उधारीच्या पैशांसाठी तिच्याकडे वारंवार मागणी केली. तिने पैसे परतवण्यालाठी त्याला घरी बोलावले. तो येताच तिने त्याला बोलण्यात गुंतवले आणि बोलता बोलता दोघांमध्ये शारिरीक संबंध झाले. एवढ्यावरच न थांबता यानंतरही तिने राकेशकडून ५० हजार रुपये आणखी घेतले. अशाप्रकारे तिची पैशांची दिवसेंदिवस वाढत गेली, जी १५ लाखांवर पोहोचली. यामुळे जेव्हा राकेशने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा ती त्याला शारिरीक संबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागली.
राकेश यामुळे पुरता भयभीत झाला होता. त्याने आरोपी श्रीदेवीशी अंतर ठेवण्यास सुरुवात केली. तर आपल्या मुलीला सुद्धा त्या शाळेतून काढून गुजरातला आपल्या मूळगावी जाण्याचे ठरवले. श्रीदेवीच्या सूचनेनुसार, तिच्या दोन मित्रांनी पीडित राकेशचे अश्लील व्हिडिओ काढून टाकण्यासाठी त्याच्याकडून २० लाख रुपयांची मागणी केली. आपल्या प्रतिष्ठेला डाग लागू नये म्हणून राकेशने १५ लाख देण्याचे मंजूर केले.
१ लाख ९ हजार त्यांच्या खात्यात ट्रान्सफर देखील केले.तर उर्वरित पैसे देण्यासाठी राकेशकडे पैसे राहिलेच नव्हते. यामुळे आरोपींनी त्याला घेरले आणि त्याच्यावर पैशांसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्या संपूर्ण प्रकाराला कंटाळून अखेर पोलिसांत धाव घेतली. त्याच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी शिक्षिका आणि तिच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.







