पनवेल (विशेष प्रतिनिधी) – कामोठे पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला 50 हजार रुपयांची लाच घेताना, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली आहे. रोहित बंडगर असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. रोहित बंडगर हे पोलीस उपनिरीक्षक पदावर कामोठे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्या सोबत त्याच मित्राला देखील अटक करण्यात आली आहे.
बंडगर हे कामोठे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. बंडगर यांच्याकडे एका व्यक्ती विरोधात फसवणूकी प्रकरणी तक्रारी अर्ज आला होता. या तक्रारी अर्जावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी त्यांनी केली होती. या बाबतची माहिती तक्रारदार यांनी लाचलूचत विभागाकडे दिली, त्यानुसार 17 ऑगस्ट रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली आहे. आणि पडताळणी केल्यानंतर बंडगर यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली होती.
त्यानुसार पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम घेण्यासाठी ट्रॅप लावण्यात आला होता. त्यानुसार ठाणे लाचलुचपत विभागाने बंडगर यांचे मित्र नितीन किशोर जोशी यांच्या खाजगी कारमध्ये दीड लाख रुपयाच्या रक्कमेपैकी 50 हजार रुपये लाच घेताना बंडगर वर त्याचे मित्र जोशी यांना रंगेहात अटक केली आहे. कामोठे वसाहतीमध्ये ठाणे लाचलुचपत विभागाच्या टीम ने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पुन्हा पोलीस खाते चर्चेत आली आहे.







