पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन आयपीएस अंजना कृष्णा यांनी आपल्या तत्परतेने आणि कणखर भूमिकेने तब्बल २५ लाख २३ हजार ७६० रुपयांचा अवैध गुटखा जप्त करत अवैध व्यापाराला जबरदस्त हादरा दिला आहे.
ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली असून, पीराची कुरोली (ता. पंढरपूर) येथून निघालेल्या एका संशयास्पद वाहनाचा माग काढत टेंबुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील परीटे गावाजवळील हॉटेल शेळकेवाढा येथे पोलीसांनी गाडी अडवली. बुलेरो पिकअप (MH 45 AF 2307) या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखू मोठ्या प्रमाणात सापडली. संबंधित वाहनचालक संतोष मोहन नकाटे (रा. वासुद, ता. सांगोला) व त्याचा साथीदार अनिल सुखदेव बेहरे (रा. बेहरे चिंचोली, ता. सांगोला) यांच्याविरोधात टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंजना कृष्णा यांच्यासोबत पोसई विरसेन पाटील, पोहेकॉ. राहुल शिंदे, पोकॉ. अजित मिसाळ आणि सुनिल लोंढे यांनी ही कारवाई यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. गुटखाबंदी कायद्याची अंमलबजावणी करत गुन्हेगारांना रोखण्यासाठी ही कारवाई एक ‘मॉडेल ऑपरेशन’ ठरत असून, पंढरपूर विभागातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी ती निर्णायक ठरणार आहे.







