ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : भाईंदर, काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील मिरागाव येथे चालणाऱ्या ‘अमर पॅलेस उर्फ मानसी ऑर्केस्ट्रा बार’वर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या बारवर छापा टाकत अश्लील डान्स सुरू असल्याचे उघड केले. कारवाईदरम्यान बारमधून १०,५०० रुपये जप्त करण्यात आले असून, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बारवर यापूर्वीही विविध नियमांचे उल्लंघन करून एक-दोन नव्हे, तर तब्बल १४ गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही आजपर्यंत या बारचा परवाना निलंबित करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश बुन्हाडे करत आहेत.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आता जोरदार मागणी केली जात आहे की, अशा बेकायदा व्यवसायांवर केवळ छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात न येता, परवाने तात्काळ रद्द करावेत आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी.







